– रेव्ह. डॉ. राजकुमार कोरे
Attribution to Sweet Publishing / FreeBibleimages.org.Creative Commons Attribution-ShareAlike 3.0 Unported license.
देवाचे पाचारण, देवाचे “मोशे” होणे
Sermon by: Rev.Dr.Rajkumar Kore
(Transcription By : Br.Arvind Thorat ,Br.Amit Thorat and Sis. Anagha Thorat)
(For video on this topic please click here: https://goo.gl/vXygFS)
प्रभूने तुमची आणि माझी निवड देखील जगाच्या स्थापनेपूर्वीच केली होती. इफिस १:४ “त्याप्रमाणे आपण त्याच्या समक्षतेत पवित्र आणि निर्दोष असावे म्हणून त्याने जगाच्या स्थापनेपूर्वी आपल्याला ख्रिस्ताच्या ठायी निवडून घेतलेले आहे.” आपण देवाचे निवडलेले लोक आहोत. आपण बाहेर बाजारात एखादी गोष्ट निवडून घेतो, दागिन्याच्या दुकानात, कित्येक दागिन्यातून, भरपूर वेळ खर्च करून एक दागिना निवडून घेतो. तो निवडून घेतल्यानंतर आपण तो खूप जपून ठेवतो. म्हणजेच निवडलेल्या गोष्टी ह्या आपण जपून ठेवतो, कारण त्या मौल्यवान असतात. आपणाला देव त्याचे खासगी धन समजतो. आपण निवडलेले आहोत आणि आपण ह्या पृथ्वीवर येण्याच्या अगोदरच त्याने आपली निवड केलेली आहे, त्याचे खासगी धन व्हावे म्हणून जगाच्या स्थापने पूर्वीच त्याने आपली निवड केलेली आहे.
जर आपण निवडलेले आहोत, तर हे लक्षात घ्या की, आपल्यासाठी “Before the Crown comes the Cross.” तुमची आणि माझी निवड ही अतिशय मोलाची गोष्ट आहे. अखिल पृथ्वीवरून जे ठराविक निवडलेले लोक आहेत, त्या निवडलेल्या लोकांत जर तुम्ही आणि मी असू, तर आज आपल्याकडे धन असो अथवा नसो, आज तुम्ही निरोगी असा अथवा रोगी असा, आज तुमच्या जीवनामध्ये भरपूर दुखः असो किंवा सुख असो, लक्षात घ्या की हे सर्व क्षणिक आहे. अनंतकाळाच्या दृष्टीने, Eternity च्या दृष्टीने पेरणी करा. जर आपण एखाद्या गावाला जर प्रवासाला निघालात तर काय पाहता ? पाण्याची बाटली घेतली का, ज्यादाचा कपड्याचा जोड घेतलाय का, कंगवा, फणी, दाडीचे सामान, इत्यादी, सगळे काही आपण अगदी यादी करून Check करून सगळ्या गोष्टी आपण पाहतो. पण अनंतकाळच्या प्रवासाला आपण निघालेलो आहोत. आज आपण स्वतःला हा प्रश्न विचारू की, अनंतकाळाच्या यात्रेला निघालेलो असता मी किती तयारी केलेली आहे?” या जगामध्ये आपण निवडलेले आहोत, हेच आम्हाला महान समाधान ख्रिस्त येशूमध्ये आहे आणि जो कोणी निवडलेला असतो त्याला बऱ्याच वेळेला त्याचे राजवाडे सोडावे लागतात. आपल्याला कदाचित आपले Comfort Zone सोडावे लागतील. कदाचित लोक तुम्हाला वेड्यात काढतील, तुमच्यावर हसतील, परंतु देव अशाच व्यक्तींची निवड करीत असतो. तुम्ही जर देवासाठी वाळवंटात गेला असाल, तर तुम्हाला तो मिसारात पुन्हा पाठवेल खरा, पण आता तो देवाचा Ambassador म्हणून पाठवणार आहे, सोडवणूक करणारा म्हणून पाठवणार आहे. एक नव्हे, दोन नव्हे तर आख्या इस्राएल राष्ट्राला तो बाहेर काढणार आहे. देवाचा मोशे आज आपण बनू या.
पौल म्हणतो ‘नग्नता, तलवार, ह्या गोष्टी देवबापाची ख्रिस्त येशूमध्ये जी प्रीती आहे या पासून आम्हाला विभक्त करायवयास समर्थ होतील काय ?’ मुळीच नाही ! आपण आज देवाचे मोशे बनू या. “संपूर्ण इस्राएल राष्ट्रात त्याच्या (मोशे) सारखा कोणी विश्वासू आणि नम्र मला आढळला नाही” असे देव साक्ष देत आहे, हे मोशे स्वतःच्या मुखाने बोलला नाही. ज्यावेळेला इस्राएल लोकांनी देवाच्या विरोधात बंडखोरी केली, त्यावेळेला मोशे देवाच्यापुढे पालथा पडला. देव त्यांचा नाश करावा असे म्हणाला तेव्हा मोशे देवाला म्हणाला “लोक म्हणतील इस्राएलाच्या देवाला त्यांना राष्ट्रातून बाहेर काढता आले नाही, तुझ्या नावाला कलंक लागायला नको.” देवाविषयी मोशे आवेशी झाला होता. अशा मोशेला देवाने पाचारण केले – ते जळत्या झुडपातून. देवाच्या बोलण्याच्या आणि पाचारण करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत आणि देव आपल्या निवडलेल्यांना नेहमी पाचारण करीत असतो. हा जळत्या झुडपाचा प्रसंग तुमच्या आणि माझ्या जीवनात आलाय का ? देव कधी तुमच्याशी तुमच्या आतापर्यंतच्या जीवनात कधी बोलला का ? जर देव बोलला असेल, तर आपण आपले मन, आपले हृदय हे कठीण केले होते का ? आम्हाला अरण्यच बरे वाटले होते का? आम्ही देवाच्या कामगिरीसाठी पुन्हा देवाचा आदेश घेऊन मिसरात गेलो होतो का ? मोशेसाठी ही गोष्ट सोपी नव्हती. फारो एक सम्राट होता. सम्राट म्हणजे सामान्य गोष्ट नाहीये. सम्राटच्या नेतृत्वाखाली एकच राष्ट्र नसते, तर अनेक राष्ट्रे असतात. त्याची सेना, त्याचे सामर्थ्य याला न भिता “यहोवा परमेश्वर असे म्हणतो” अशी आज्ञा घेऊन मोशे जातो आणि म्हणतो ‘माझ्या लोकांनी माझ्यासाठी रानात यज्ञ करावा म्हणून तू त्यांना सोड.’ तेव्हा फारो म्हणतो ‘ हा कोण यहोवा की मी त्याचे ऐकावे?’ आणि मग देव फारोला फटके देतो (पीडा). येथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की, एका मनुष्याच्या द्वारे देव राजाला , एक सम्राटाला नमवत होता. असे Ambassadors त्याने तुम्हाला आणि मला बनवलेले आहे. एवढे महान सामर्थ्य घेऊन देव जेव्हा पाठवतो, देव जेव्हा निवडतो, त्यावेळेला तो आपल्याला सामर्थ्याचा अधिकार घेऊन पाठवतो. त्या सामर्थ्याच्या पुढे मोठ्या मोठ्या राष्ट्राचे देखील काही चालत नाही. ही निवड व्यर्थ समजू नका प्रीयांनो. मोठमोठ्या गोष्टी करण्यासाठी देवाने आपल्याला पाचारण केलेलं आहे. आज आम्ही ते पाचारण लक्षात घेऊ या. मला देवाने का निवडले ? माझा जन्म होण्याच्या अगोदर त्याने मला निवडले आणि ख्रिस्ती आई – बापाच्या पोटी त्याने मला जन्माला घातले. त्याने मला त्याच्या कृपेत राखले. मला त्याने ख्रिस्ताची ओळक होऊ दिली म्हणून आज मी येथे आहे. देवाने आपल्याला त्याचे विशेष लोक म्हणून निवडले आहे एका विशेष कामगिरीसाठी. जळणाऱ्या झुडपातून तो पाचारण करीत आहे.
God bless you.
रेव्ह. डॉ. राजकुमार कोरे
Comentarios