top of page
Search
Writer's pictureRajkumar Kore

याकोबाची झोंबी:पनिएल आशीर्वाद मिळवण्याचे ठिकाण








याकोबाची झोंबी


Sermon By: Rev.Dr. Rajkumar Kore



(Transcription By : Br.Arvind Thorat ,Br.Amit Thorat and Sis. Anagha Thorat)



उत्पत्ती ३२: २२-३२ वाचा. पनिएल येथे याकोबाने केलेली झुंज.

ह्या शास्त्रपाठात आपण पाहतो की, झोंबी केल्यानंतर याकोबाला आशीर्वाद प्राप्त झाले. काही वेळेस ही झोंबी केल्यानंतरच आम्हाला आशीर्वाद प्राप्त होतात. उत्पत्ती ३२:२९ सांगते – मग त्याने त्यास म्हणजे देवाने याकोबास तेथेच (त्याच जागी) आशीर्वाद दिला. आमच्या जीवनात अशी कोणती जागा आहे की जेथे आम्हाला आशीर्वाद मिळतात? ही आशीर्वादाची जागा आम्हाला शोधायची आहे.

झोंबी का करावी लागते? – उगाचच झोंबी करावी लागत नाही. झोंबी करावी लागते ह्याचे कारण म्हणजे – आम्ही याकोब असतो. याकोब म्हटले की एक ठराविक प्रतिमा चटकन आमच्या डोळ्यांसमोर येते –

१.तो टाच धरणारा होता, किंवा युक्तीने हिरावून घेणारा होता. म्हणजे तो Grabber होता. ही हिरावून घेण्याची वृत्ती तुमच्यात आणि माझ्यातही आहे. आमच्या कुटुंबातच, बहिण-भावंडांच्या बाबतीत आम्ही असेच वागतो. एखाद्या गोष्टीचा मोह अनावर झाला की ती दुसऱ्यांना न मिळू देता आम्हालाच कशी मिळेल ह्यासाठी आम्ही युक्त्या लढवतो. हाच स्वभाव मग आपण आत्मसात करून आपण Self-centred होतो, आणि आपल्या स्वार्थासाठी आपण दुसऱ्यांचा हक्क काढून घेतो. भुकेल्या एसावाशी अन्नाचा सौदा करून याकोबाने त्याचा ज्येष्ठपणाचा हक्क हिरावून घेतला.

याकोब खोटे बोलून फसवणारा होता - याकोबाला आशीर्वाद देण्यापूर्वी इसाहाकाला शंका येते. तो त्याला विचारतो की “माझ्या बाळा तू कोण आहेस?” तेव्हा याकोब सहजपणे खोटे बोलून आपल्या जन्मदात्याला फसवतो. तो म्हणतो की “मी एसाव, आपला प्रथम जन्मलेला पुत्र आहे”. आम्ही खुद्द आमच्या जन्मदात्याशी अनेकदा खोटे बोलून त्यांना फसवत असतो. आठवून पहा! त्याचे आम्हाला काहीच वाटत नाही. इतकी सवय झालेली असते, पण देव आपल्याकडे पाहत असतो. त्याचे आपल्यावर लक्ष असते.

याकोब देवाचे नाव व्यर्थ घेणारा होता – इसाहाक जेव्हा त्याला विचारतो की, हरणाचे मांस तुला एवढ्या लवकर कसे मिळाले? तेव्हा याकोबाचे उत्तर बघा काय आहे. “आपला देव परमेश्वर याने मला ते लवकर मिळू दिले”. किती सहजपणे. आपणही सहज देवालामध्ये घेऊन खोटे बोलतो. स्वार्थ साधण्यासाठी, आपले चुकीचे वागणे कसे बरोबर आहे, कसे सत्य आहे, हे दाखवण्याचे प्रयत्न करतो. देवाचे नाव व्यर्थ घेतो. पण देवाचे नाव मध्ये घेण्यापूर्वी दोनदा विचार करा. त्याची आज्ञाच आहे “तू आपला देव परमेश्वर याचे नाव व्यर्थ घेऊ नको.

एवढे असूनही देव मात्र उत्सुक असतो आम्हाला आशीर्वाद द्यायला. देव याकोबाला आशीर्वाद द्यायला उत्सुक होता. देवाची इच्छा होती त्याला आशीर्वाद देण्याची. पण जोवर त्याच्यातील याकोब मरत नव्हता, त्याची सौदेबाजीची वृत्ती जात नव्हती, परमेश्वराला विनाकारण मध्ये घेण्याचा स्वभाव जात नव्हता तोवर त्याला हे आशीर्वाद मिळत नव्हते. देव मात्र आम्ही वाईट असतानाही आमच्यावर प्रेम करतो. याकोबावरही तो प्रेमच करीत होता. तो याकोबाला आशीर्वाद द्यायला उत्सुक होताच, जन्मापासूनच. उत्पत्ती २८:१३-१५ – ह्या वचनांत हे अधिक स्पष्टपणे दिसून येते. ह्या आशीर्वादाचे वैशिष्ठय असे आहे की हा आशीर्वाद देताना देवाने कोठेही जर-तर (Conditions) ची भाषा केलेली नाही. जर माझ्या आज्ञा पाळल्यास, जर माझी उपासना केलीस - तरच हे आशीर्वाद तुला देईन, असे तो कोठेच म्हणत नाही. तो उत्सुकच होता याकोबाला आशिर्वाद द्यायला. याकोब जेव्हा पित्याच्या घरापासून हारानास जाण्यास निघाला तेव्हा सूर्यास्त झाल्यामुळे तो बेथेल ह्या ठिकाणी धोंडा उशास घेऊन निजला. तेव्हा त्याला पृथ्वी व स्वर्ग ह्यांना जोडणारी शिडी दिसली आणि पहा परमेश्वर त्याजपाशी उभा राहून त्यास म्हणाला “मी परमेश्वर, तुझा पिता अब्राहाम याचा देव व इसाहाकाचा देव आहे. ज्या भूमीवर तू निजला आहेस ती मी तुला व तुझ्या संततीला देईन. तुझी संतती पृथ्वीच्या रजाइतकी होईल. पूर्व-पश्चिम, उत्तर-दक्षिण अशा चारही दिशास तुझा विस्तार होईल, तुझ्या व तुझ्या संततीच्याद्वारे पृथ्वीवरील सर्व कुळे आशीर्वादित होतील. पहा मी तुझ्या बरोबर आहे आणि जिकडे जिकडे तू जाशील त्या सर्व ठिकाणी मी तुझे संरक्षण करीन, आणि तुला ह्या देशात परत आणीन. तुला सांगितले ते करीपर्यंत मी तुला अंतर देणार नाही”. पहा प्रभूने कोठेही जर-तरची भाषा वापरलेली नाही. त्याने फक्त भरभरून आशिर्वाद दिला. याकोब मात्र ह्याच अध्यायात वचन २१:२२ मध्ये म्हणतो “देव मजबरोबर राहून ज्या वाटेने मी जात आहे तीत माझे रक्षण करील. मला खाण्यास अन्न, ल्यावयास वस्त्र देईल, आणि मी आपल्या पितृ घरी सुखरूप परत येईन तर परमेश्वर माझा देव होईल”. परमेश्वर एवढे आशिर्वाद देण्यास उत्सुक आहे, पण याकोबाची सौदेबाजी अजूनही जात नाही. हा जर तर करणारा याकोब, ही सौदेबाजी आमच्यातही आहे. माझ्या बाबतीत अमुक एक गोष्ट घडली, तर प्रभू मी नियमित चर्चला येईन. माझी ही इच्छा पूर्ण कर, मी नियमित प्रार्थना करीन, तुझे वचन वाचेन वगैरे. पण प्रभू म्हणतो – “पहिल्याने त्याचे राज्य मिळविण्यास झटा म्हणजे याही गोष्टी तुम्हाला मिळतील”. देव स्वतःहून सर्व आशिर्वाद याकोबाला मुक्त हस्ते द्यायला तयार आहे. सर्व देवातर्फे म्हणजेच एकतर्फेच चालू आहे. देव उत्सुक आहे आज तुम्हाला आणि मला आशिर्वाद द्यायला. आज आम्हाला प्रत्येकाला आशीर्वादाने तो भरून टाकणार आहे. त्याचा गुणच आहे आशीर्वाद देण्याचा. पृथ्वीची निर्मिती करून त्याने मनुष्याची निर्मिती करीत म्हटले “फलद्रूप व्हा,बहुगुणीत व्हा, पृथ्वी व्यापून टाका, ती सत्तेखाली आणा”. किती मोठा आशिर्वाद आहे हा. देव उत्सुक आहे, तरी हे आर्वाद आम्हाला का मिळत नाहीत? याचे कारण म्हणजे आमचे आचरण! अगदी छोटी पापे, आमची कुकृत्ये, स्वतःची चैनबाजी, कुरकुर, दुसऱ्यांना फसवण्याचा स्वभाव,या गोष्टी देवाला आवडत नाहीत. तो त्यांचा तिरस्कार करतो, आणि आपण मात्र ह्या गोष्टी अगदी सहजपणे, नेहमीच करतो. मोठे खून, दरोडे, यासारखी भयंकर चटकन नजरेत भरणारी पापे आम्ही करीत नाही. पण या लहान सहान पापांनीच आम्ही मोठा पापाचा डोंगर केव्हा रचतो हे आम्हालाच काळत नाही. काईनासारखा खून नाही, साध्या गोष्टी केल्या. साधे पाप किंवा मोठे पाप, पाप ते पापच. त्यात फरक नाही. त्या मनाई केलेल्या फळाचा एकच घास खाल्याने संपूर्ण मानव जात अधोगतीला गेली, हे लक्षात ठेवणे महत्वाचे आहे. दुबळ्या मोहाच्या क्षणाला बळी पडल्याने एसावाने वडीलपणाचा हक्क गमावला. लोटाने एकच चुकीचा निर्णय घेतला आणि तो सदोमात गेला. तेथे प्रथम त्याच्या अंतरीची साक्ष लुप्त झाली आणि नंतर तो पत्नी व जवळ जवळ सर्वच मालमत्ता गमावून बसला.

मुका – चुंबन किती साधी गोष्ट, पण त्यामुळेच देवाचा पुत्र त्याच्या शत्रूच्या हाती धरून दिला गेला. पहा, कसा छोट्याशा ठिणगीतून वणवा भडकतो. ह्या सर्वांचा परिणाम म्हणजे देव उत्सुक असूनही आमचे आशीर्वाद लांबणीवर पडतात. आपणच देवाला वाट पहायला लावतो आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी. होशेय १२:२ “तो याकोबाला त्याच्या आचरणाप्रमाणे शासन करील; त्याच्या कर्माप्रमाणे त्याला प्रतिफळ देईल”. याकोबाला २० वर्षे चाकरी करावी लागली. २० वर्षे लागली त्याला पनिएल या ठिकाणी यायला. आज आम्हाला किती वर्षे लागतील त्या ठिकाणी जायला. आजूनही काही आशीर्वाद मिळण्याचे बाकी आहेत काय? अब्राहाम, इसाहाक खूपच श्रीमंत होते, तरीही याकोबाला चाकरी करावी लागली. आम्ही अजूनही पापी देह स्वभावाची गुलामगिरी आणि चाकरी करत आहोत काय? तर जरुर आमची जीवन शैली आम्ही तपासून पहाण्याची गरज आहे. २० वर्षांनंतर याकोब पित्याच्या घरी चाललेला आहे. आपल्या प्रिय जनांना, आई वडिलांना, भावाला भेटायला तो चाललेला आहे. अनेक भावना त्याच्या मनामध्ये दाटून आल्या असतील. एसाव कसा वागेल? ही चिंता सुद्धा त्याला वाटत असेल. अशा संमिश्र भावनांनी व्यथीत झालेला याकोब, यब्बोक नदी पर्यंत येतो. बरोबरचा सर्व लवाजमा, बायका मुले त्याने पूढे पाठवून दिले. तो एकटाच मागे नदी जवळ थांबला. यब्बोक नदी – नदी सुद्धा देवाने अशी निवडली आहे जिला काही विशिष्ट अर्थ आहे. यब्बोक या शब्दाचा अर्थ आहे “रिक्त करणे – Empty Out”. या ठिकाणी याकोब आता रिक्त होणार होता. देवाने अशी जागा निवडली की जेथे याकोब भग्न होणार होता, अनुतप्त होणार होता. पश्चाताप करणार होता. कोणा एका पुरुषाने त्याच्याशी पहाट होईपर्यंत झोंबी केली. याकोबावर सरशी होत नाही असे पाहून त्याने त्याच्या जांघेस स्पर्श केला, आणि ती उखळली असे म्हटले आहे. जांघेलाच स्पर्श का केला? कारण हा जो स्नायू आहे तो शरीरात सर्वात बळकट आहे. आपली ताठपणे उभी राहण्याची आणि बसण्याची भिस्त ह्याच स्नायूवर अवलंबून आहे. म्हणजेच – आपल्यातील ते बलस्थान आहे की ज्याच्यावर आम्ही पूर्ण भिस्त टाकून असतो. आम्ही हरणार नाही असे वाटत असते. त्यालाच प्रभू जरासा स्पर्श करतो, आणि ती बलस्थाने उखडली जातात. कोणती बलस्थाने आहेत ही? ज्ञानाची विद्वत्ता, समाजात उच्च स्थान, अति धार्मिकपणा (शास्त्री, परुशी), सधनता किंवा भरपूर पैसा. हीच चूक त्या श्रीमंत मनुष्याने केली, लहान कोठारे मोडून मोठी कोठारे बांधून भरपूर धनधान्य साठवून तो म्हणाला, “माझ्या जीवा, खा, पी मजा कर”. पण अशा लोकांना देव काय म्हणतो ते पहा, “अरे मुर्खा आज रात्री तुझा जीव मागितला जाईल, मग हे जे तू सिद्ध केलेस ते कोणाचे होईल?”. प्रभूवरील भिस्त काढून त्याने संपत्तीवर ठेवली. संपत्ती साठवणे वाईट नाही, पण आपण त्या संपत्तीवर नव्हे तर, ती संपत्ती पुरवणारा जो आपला जिवंत देव त्यावर संपूर्ण भिस्त टाकली पाहिजे.

जांघेचा स्नायू उखडल्यामुळे आता याकोबाला काही उभे राहता येईना. आता तो त्या झोंबी करणाऱ्या पुरुषाला म्हणजेच प्रभू येशू ख्रिस्ताला धरू पाहतो, त्याचा आधार घेऊन तो उभा राहण्याचा प्रयत्न करतो. आता तो पूर्णपणे त्याच्यावर अवलंबून आहे. अशाच प्रकारे आम्हीही प्रभूवर अवलंबून रहायला शिकतो. प्रभूवर जर अवलंबून रहायचे असेल तर कुठेतरी आमच्या जांघेच्या स्नायूला स्पर्श होणे गरजेचे आहे. त्याशिवाय आम्ही प्रभूला बिलगून राहूच शकत नाही. जोवर आम्ही आपल्या दोन्ही पायांवर धडधाकटपणे उभे आहोत, तोवर आम्ही आमच्याच मार्गाने चालतो, आणि देवाचे आशीर्वाद दूर करतो. पण “हे देवा तुझ्याशिवाय मी चालूच शकत नाही” अशी परिस्थिती जेव्हा आमच्या जीवनात येते That Is The Proper Place of Blessing. कारण आमची बलस्थाने नाहीशी झालेली असतात. कारण आता आम्ही प्रभूवर अवलंबून राहतो, आणि याकोबाप्रमाणे आशी र्वादाची याचना करतो. म्हणून त्याचे आशीर्वाद, त्याची खरी शांती यांचा अनुभव प्रत्येक क्षणी आम्हाला येते. यब्बोक अशी जागा आहे की जेथे आम्ही आपला देह स्वभाव, मी पणा काढून रिक्त होतो आणि परमेश्वर आपणास आशीर्वाद देतो. येथेच आम्हाला आशीर्वाद मिळतात. देवाचे आशीर्वाद येथेच Release होतात.

याकोबाने त्या पुरुषाला धरून ठेवले आहे, मला आशीर्वाद दिल्या शिवाय मी तुला जाऊ देणार नाही. येथे तो पुरुष त्याला विचारतो, तुझे नांव काय? हाच प्रश्न का विचारावा? याचे आश्चर्य वाटते. तो झोंबी करणारा प्रभू आहे तर त्याला याकोबाचे नांव तर नक्कीच माहीत असणार. बेथेल या ठिकाणी तो त्याला म्हणाला होता, मी तुझा पिता अब्राहाम, इसाहाक यांचा देव आहे, मग याकोबाचे नांव तर त्याला माहिती असणारच, तरी तुझे नांव काय असा प्रश्न तो विचारतो. त्याला वदवून घ्यायचे आहे. २० वर्षांपूर्वी हाच प्रश्न त्याचा पिता इसाहाक ह्याने आशीर्वाद देते वेळी विचारला होता, “माझ्या बाळा तू कोण आहेस?”. त्यावेळेस उत्तर होते “मी एसाव आपला प्रथम जन्मलेला पुत्र”. २० वर्षांनंतर मात्र उत्तर आहे “मी याकोब आहे”. ही याकोबाची कबुली आहे. हा याकोबाचा पश्चाताप आहे. होय प्रभू मी Guilty आहे. मीच तो टाच धरणारा याकोब आहे. एसावाचा हक्क हिरावून घेणारा तो मीच याकोब आहे. तुझे नांव व्यर्थ घेणारा तो मीच पातकी आहे. प्रभू मला क्षमा कर. मला आता तुझ्याशिवाय आधार नाही. मी आपले अपराध परमेश्वराजवळ कबुल करेन असे म्हणालो तेव्हा तू माझ्या पापांची क्षमा केली. याकोबाला क्षमा मिळाली. पश्चातापाची ती ही जागा आहे की जेथे देव त्याला आशीर्वादित करणार होता. भग्न याकोबाचा तो पश्चाताप पाहून, प्रभू त्याला आशीर्वाद देत म्हणतो, “येथून पुढे तुला याकोब नाही, तर इस्राएल म्हणतील”. इस्राएल म्हणजे “देवा बरोबर अधिपती” (Prince With God). फसवणारा होता, तो देवाबरोबर राहणारा राजपुत्र झाला. पश्चातापी याकोबाचे परिवर्तन झाले. जुना याकोब मरण पावून नवीन इस्राएलाचा जन्म झाला. आशीर्वादाची ही ती जागा आहे, यब्बोक या ठिकाणी येऊन आमची झोंबी होते. आमचा जांघेचा स्नायू उखडला जातो. घमेंड जाऊन लीन आणि नम्र होतो. आमचा नव्याने जन्म होतो. दोन लोक आमच्याशी झोंबी करतात. १.आमचा देह स्वभाव, २. आमच्यात वसणारा पवित्र आत्मा.

प्रेषित पौल म्हणतो त्याप्रमाणे चांगले करण्याची आमची इच्छा असते, पण आमच्या हातून वाईट गोष्टी घडतात. कारण आमच्यातील पापी देह स्वभाव. रोज यब्बोक येथे आम्हाला सामना करावा लागतो. जर आमच्या जांघेला स्पर्श झाला तर ते ठिकाण देवाने आमच्यासाठी जिंकलेले आहे. त्याचे आशीर्वाद मिळतातच. जांघेच्या स्नायूला स्पर्श होऊन जेव्हा वेदना होतात, तेव्हा देवाला दोष नाही तर धन्यवाद द्यायचा आहे. कारण तेथे आमच्यातील याकोबाचे इस्राएलात रुपांतर झालेले असते. त्या ठिकाणाला याकोबाने पनिएल – देवाचे मुख म्हटले आहे. कारण तेथे पश्चातापी याकोबाला देवाचे दर्शन झाले.

शेवटच्या वचनात आम्ही पाहतो की, तो पनिएल सोडून निघाला, तेव्हा सूर्योदय झाला होता. आपल्या पित्याच्या घरापासून हारानास याकोब जायला निघाला तेव्हा सूर्यास्त झाला होता. आता पित्याकडे पुन्हा जाताना सूर्योदय होत आहे. सुर्यास्ता पासून सुर्योदयापर्यंतचा हा प्रवास आहे. प्रारंभी देवाने सृष्टी निर्माण केली, तेव्हा प्रत्येक दिवशी तो म्हणाला संध्याकाळ झाली, सकाळ झाली हा पहिला दिवस. असे देवाने का म्हटले? कारण ही तारणाची योजना आहे. पापाच्या अंधारातून नवीन जीवन. त्या निबिड अविश्वासाच्या काळोखातून प्रकाशाकडे नेणारा आमचा समर्थ देव आहे. जेव्हा आम्ही प्रभूपासून दूर जातो, तेव्हा आमच्या जीवनात सूर्यास्त होतो पण पुन्हा जेव्हा याकोबाप्रमाणे आम्ही दीन व नम्र होतो तेव्हा आम्ही पित्याकडे धाव घेतो. फक्त त्याच्यावरच अवलंबून राहतो. तेव्हा आमच्याही जीवनात सूर्योदय होतो, आमचे तारण होते.

आम्हाला देवाचे दर्शन घ्यायचे असेल तर आजच यब्बोक येथे पश्चाताप करीत रिक्त होत, शुद्ध अंतःकरणाने आम्ही पनिएल येथे जाऊ. त्याचे आशीर्वाद आणि शांती प्राप्त करून घेऊ. प्रभू म्हणतो ‘जे अंतःकरणाचे शुद्ध ते धन्य कारण ते देवाला पाहतील’.

आमेन.

Bible Study Sermon by Rev. Dr. Rajkumar Kore

(Transcription by Br.Arvind Thorat ,Sis.Anagha Thorat and Br. Amit Thorat)


215 views0 comments

Comments


bottom of page