याकोबाचे इस्राएलात रुपांतर होणे
Sermon By: Rev.Dr. Rajkumar Kore
Sermon in 2018
(Transcription By : Br.Arvind Thorat ,Br.Amit Thorat and Sis. Anagha Thorat)
या ठिकाणी आपण जेव्हा लेवीय पुस्तकामध्ये लेवीय १:२ पाहिले तेव्हा देव मोशेला ‘इस्राएलाशी’ बोल असे म्हणतो. यात काय रहस्य आहे ? इस्राएल राष्ट्र हे याकोबाच्या १२ पुत्रांपासून झालेले आहे हे आपल्या सगळ्यांना माहित आहे. तेव्हा हा जो याकोब आहे – याचा शब्दश: अर्थ आहे ‘फसवणारा’. हा याकोब जो आहे, युक्तीने त्याने आपल्या भावाकडून ज्येष्ठत्वाचे अधिकार घेतले होते, हे देखील आपणाला माहित आहे आणि नंतर तो आपल्या मामाकडे पळून गेला हे देखील आपल्याला माहित आहे. त्या ठिकाणी बऱ्याच कष्टातून, त्रासातून त्याला जावे लागले… हा सर्व इतिहास आपल्याला माहित आहे. परंतु पदनरामातून मामाकडून जवळपास २० वर्षांनी तो स्वगृही परतत असताना तो आपल्या घराजवळ येण्याच्या अगोदर त्याला एसावाला सामोरे जावे लागणार होते, तो भयभीत झालेला होता. त्याने काल्पांची विभागणी केली आणि तो स्वतः ‘यब्बोक नदीच्या’ जवळ पाठीमागे राहिला. त्याठिकाणी परमेश्वराच्या दूताबरोबर त्याची झोंबी झालेली आहे असे शास्त्र आपल्याला सांगते. झोंबी म्हणजे Wrestling. त्यानंतर तो परमेश्वराचा दूत याकोबाच्या जांघेच्या स्नायूला स्पर्श करतो आणि त्याचा सांधा निखळतो. तो पर्यंत याकोब निकराने त्याच्याशी झोंबी करीत होता परंतु आता त्याचा जांघेचा स्नायू निखळल्या नंतर तो हतबल झालेला आपण पाहतो. याठिकाणी याकोब त्या दुताला म्हणतो ‘तू मला आशीर्वाद दिल्याशिवाय मी तुला जाऊ देणार नाही.’ याकोब आता त्याला धरून राहतो, कारण आता तो लंगडत होता. आपण जर Medically पाहिले तर आपला जो कमरेचा जो सांधा आहे हा सगळ्यात Strongest Joint आहे.
आपल्या शरीराचे सगळे वजन ते पायावरती पेलण्यासाठी याठिकाणी आपल्या शरीराचे वजन transfer होते. तेव्हा ही जी काही बलस्थाने असतात आपल्या जीवनामध्ये या बलस्थानावर आपण आपल्या जीवनाम्ध्ये भिस्त टाकून असतो. ज्यावेळेस हे बलस्थाने आमच्या जीवनातून तुटतात त्यावेळेला मात्र आम्ही संपूर्णपणे आमच्या जीवनाची भिस्त देवावरती टाकायला लागतो. याठिकाणी तो जो दूत होता, तो याकोबाला एक प्रश्न विचारतो की, ‘तुझे नाव काय.’ हा जो दूत आहे तो सामान्य दूत नव्हता, तर प्रभू येशू ख्रिस्ताचे या पृथ्वीवरती येण्याअगोदरचे जे रूप आहे – यहोवाचा दूत म्हणून तो त्याला प्रगट झालेला आहे. तेव्हा या दुताला त्याचे (याकोबाचे) नाव माहित होते. परंतु त्याच्या ह्या प्रश्नामध्ये हा असा अर्थ प्रगट होतो की, तुझे नाव काय आणि तो (याकोब) म्हणतो माझे नाव याकोब आहे – म्हणजे या ठिकाणी याकोब कबूल करीत आहे की, ‘होय मी फसवणारा – याकोब आहे.’ जेव्हा आम्ही अशा प्रकारे पश्चाताप करतो, प्रभूला शरण जातो, त्यावेळेला – जसा तो दूत त्याला (याकोबाला) म्हणाला, यापुढे तुला याकोब म्हणणार नाही तर इस्राएल असे म्हणतील. पनिएल ही ती जागा आहे ज्याठिकाणी आमचे नाव बदलले जाते. आम्ही ‘याकोबाचे इस्राएल बनतो.’ पनिएल ही जागा आम्हाला मुक्त करणारी अशी जागा आहे, स्वतःचे परीक्षण करायला लावणारी जागा आहे. आम्ही कोण आहोत याच्याकडे आम्हाला लक्ष लावायला सांगणारी ती जागा आहे. पनिएल ती जागा आहे, ज्या ठिकाणी आम्ही आपल्या देह स्वभावाला देवाच्या सामर्थ्याने जीवे मारतो. पनिएल ती जागा आहे जेथे आमची स्वतःची इच्छा तुटलेली असते आणि आम्ही फक्त देवावरती भरंवसा टाकायला शिकलेलो असतो. तेव्हा इस्राएल हा नवा मनुष्य आहे हे आपल्याला येथे दिसते. देवाने त्याठिकाणी नवे नाव त्याला (याकोबाला) दिलेले आहे आणि हा नवा मनुष्यच देवाची उपासना करण्यास पात्र असतो. हे या ठिकाणी इस्राएल हा शब्द वापरून देव आपणास दाखवीत आहे. याकोब हा शब्द वापरून तो (देव) या सूचना देत नाहीये. या सूचना कोणत्या आहेत ? तर होमार्पणाच्या द्वारे देवाला उपासना कशी सादर करावी याबद्दल देव सांगत आहे. परंतु याबद्दल सांगत असताना दोन नावांपैकी तो (देव) याकोब हे नाव न वापरता/ निवडता इस्राएल हे नाव मुद्दाम निवडत आहे कारण ‘इस्राएल’ या नावात नवा मनुष्य दडलेला आहे.
God Bless You.
Rev.Dr.Rajkumar Kore.
Comments