top of page
Search
Writer's pictureRajkumar Kore

संपूर्ण जगात बायबल, प्रभू येशू ख्रिस्त व ख्रिस्ती धर्मच का ? तर्कनिष्ठता व सत्यता यांचे पुरावे



लेखांक: १

बायबल हे दैवी प्रेरणेने लिहिले गेले आहे काय ?

( बायबलची निर्मिती ही दैवी प्रेरणेतुनच झाली आहे ! याचे पुरावे )


लेखक : - पास्टर डॉ . राजकुमार विक्रम कोरे , पुणे (डायरेक्टर फायर मिनिस्ट्री)


बायबल हया धर्मग्रंथाचे दोन भाग असून ओल्ड टेस्टामेंट ( जुना करार ) हा भाग ख्रिस्त पूर्व काळात मूळात हिंब्रु भाषेत लिहिला गेला आहे . न्यू टेस्टामेंट ( नवा करार ) हा बायबलचा दुसरा भाग इसवी सनाच्या पहिल्या शतकात मूळात ग्रीक भाषेत लिहिलेला आहे . बायबलमध्ये एकूण ६६ पुस्तके असून इसवी सनाच्या पहिल्या शतका पर्यंत सुमारे १५५० वर्षाच्या काळात जवळपास ४० वेगवेगळया व्यक्तिंनी वेगवेगळ्या स्थानात जिवंत देवाच्या प्ररणेने पवित्र आत्म्यापासून प्राप्त झालेले शब्द बायबलमध्ये जसेच्या तसे लिहिले आहेत , व ते तसेच मानवजातीला सुपूर्त केले आहे असा ख्रिश्चन धर्म विश्वास आहे .


याच्याच जोडीला , बायबल हे दैवी प्रेरणेनेच लिहिलेले आहे हे बुध्दिप्रामाण्याच्या निकषांवर देखील सिध्द झालेले आहे .


एखादी गोष्ट असामान्य , मानवी ज्ञानाच्या व शक्तिच्या पलीकडची व दैवी उगमातून आहे हे सिध्द करण्यासाठी काही सर्वमान्य निकषांवर ( युनिव्हर्सल क्रायटेरिया अँड ट्रुथसवर ) त्या गोष्टींची पडताळणी करणे आवश्यक असते . त्यासाठी खालील निकष महत्त्वाचे आहेत .


१) सत्यता ( रिॲलिटी)


२ ) अचूकता (अक्युरसी )


३ ) अटळता ( इनएव्हिटॅबिलीटी )



उपरोक्त निकष लावून बायबलची पडताळणी केल्यास निघणारे निष्कर्ष स्तिमित करणारे आहेत असे दिसून येते.


निकष -१ ( सत्यता )



बायबलमध्ये वर्णन केलेल्या व्यक्ति , घटना , स्थळे हया काल्पनिक नसून सत्य आहेत हे सिध्द करणारे बायबलबाहय ऐतिहासिक हस्तलिखिते व उत्खननातील अवशेष पुरावे ( आरकिऑलॉजीकल एव्हिडंसेस ) आज मुबलक प्रमाणात जगात उपलब्ध आहेत . उदा . येशु ख्रिस्त नावाची ऐतिहासिक व्यक्ति २००० वर्षापूर्वी या जगात होती हे दर्शविणारा सज्जड पुरवा खालील ख्रिस्तीतर इतिहासकारांनी प्राचीन काळात लिहून ठेवला आहे .


इसवी सनाच्या पहिल्या शतकातील रोमन इतिहासकार कॉरनेलियस टॅसिटस याने इसवी सन ११५ च्या सुमारास ' एनल्स १५.४४ ' या ऐतिहासिक दस्तऐवजांमध्ये ख्रिस्ताचा उल्लेख केला आहे . टायबेरियसच्या कारकिर्दीमध्ये ख्रिस्तीधर्म स्थापक , ख्रिस्ताला ज्युडिया (प्रांताचा) ( सुभेदार) पॉटीयस पायलेट याने मृत्युदंडाची शिक्षा दिली असे या इतिहासकाराने स्पष्ट शब्दात लिहून ठेवले आहे .


इसवी सनाच्या पहिल्या शतकातच आणखी एक यहुदी इतिहासकार जोसेफस फ्लेवियस याने इसवी सन ९५ च्या सुमारास अँटीक्विटीज नावाच्या पुस्तकात ( अँटीक्विटीज १८ : ३ : ३ ) असे नमूद केले आहे की ,

“ आता त्या सुमारास येशु नावाचा हुशार मनुष्य होता , जर त्याला मनुष्य म्हणता येत असेल तर , कारण त्याने अद्भूत कृत्ये केली . त्याच्या मागे त्याने अनेक यहुदी व विदेशी आकर्षून घेतले . तो ख्रिस्त होता आणि आमच्यातील पुढाऱ्यांनी सांगितल्यावरुन पायलेटने त्याला क्रॉसवर ( मरण्याची ) शिक्षा दिली . ज्यांनी प्रथम त्याच्यावर प्रीती केली होती त्यांनी त्याला सोडले नाही . तिसऱ्या दिवशी जिवंत होऊन त्याने त्यांना दर्शन दिले . दैवी संदेष्टयांनी हया गोष्टीचे भाकीत आणि इतर दहा हजार अदभूत गोष्टी सांगुन ठेवल्याप्रमाणे हे झाले आणि त्याच्यावरुन नाव पडलेली ख्रिश्चन नावाची टोळी ( गट ) आजच्या दिवसापर्यंत नष्ट झाली नाही."


इसवी सन ९५ च्या आसपास इतका स्पष्ट पुरावा, तोही एक यहुदी लेखक कसा लिहू शकेल ? अशी शंका काही टीकाकारांनी उधृत केली. ती शंका व्यर्थ आहे . "टेक्स्चुअल क्रिटीसिझम " च्या मापदंडाद्वारे उपरोक्त उताऱ्याला काहीच दोष लावता येत नाही आणि भरपूर हस्तलिखितांचा एकमुखी पुरवा याबाबतीत उपलब्ध आहे .


सुटोनियस हा आणखी एक सुप्रसिध्द रोमन इतिहासकार. हॅड्रीअन सम्राटाच्या दरबारातील तो एक अधिकारी देखील होता . इसवी सन १२० च्या सुमारास ' लाईफ ऑफ क्लॉडीयस २४.४ ' या दस्तऐवजामध्ये रोम मधील यहुद्यांच्या संदर्भात ख्रिस्ताचा उल्लेख त्याने केला आहे .


आशिया मायनर मध्ये बिथानियाचा गर्व्हनर म्हणून काम पाहणरा प्लिनी द यंगर यान इसवी ११२ च्या सुमारास रोमन सम्राट ट्राजनाशी केलेल्या पत्रसंपर्कामध्ये (एपिसल्स १० : ९ ६ ) ख्रिस्ताची देव म्हणून ख्रिश्चन लोकांकडून होत असलेल्या भक्तिचा उल्लेख करण्यात आला आहे .


जन्माने समॅरोटन असलेला पहिल्या विदेशी इतिहासकार थॅलस याने इसवी सन ५२ मध्ये जे लिहनू ठेवले होते ते ज्युलियस आफ्रिकॅनस हया ख्रिश्चन लेखकाने सन २२१ मध्ये उधृत केले , ' येशू ख्रिस्ताला क्रॉसवर खिळल्यानंतर


२० वर्षाच्या आत थॅलसने हे लिखाण केले आहे . त्याने येशू ख्रिस्ताच्या मृत्यूच्या दरम्यान पडलेल्या अंधाराबद्दल उल्लेख केला आहे . ( बायबलमध्ये या दिवशी अचानक पडलेल्या अद्भूत अंधकाराची नोंद केलेली आढळते - बायबल लूक २३:४४ )


इसवी सन ७३ च्या सुमारास लिहिलेले कुतुहलजनक हस्तलिखित ब्रिटीश म्युझीयममध्ये शाबूत राहिलेले आहे. हे पत्र मारा - बार - सेरापिऑन नावाच्या सिरीयन व्यक्तिने तुरुंगात असताना सेरापिऑन नावाच्या त्याच्य मुलाला लिहिलेले आहे . त्यात तो म्हणतो ‘ यहुद्यांनी आपल्या शहाण्या ( बुध्दीवान ) राजाला शिक्षा देऊन काय मिळवले ? त्या घटनेपाठोपाठ त्यांचे राज्यही नष्ट झाले . “ देवाने न्यायाने त्यांचा बदला घेतला . ”


हया कुतुहलजनक लेखात यहुद्याचा हुशार ( वाईज ) राजा म्हणून ज्याचा उल्लेख आला आहे . ते येशू ख्रिस्ताच्या संदर्भात लिहीलेले आहे हे समजायला वेळ लागत नाही . बायबलमध्ये येशू हा यहुद्यांचा राजा म्हणून जन्माला आला अशी नोंद आहे . तसेच त्याच्या मृत्युच्या वेळी रोमी सुभेदाराने क्रॉसवर लॅटीन , ग्रीक व हिब्रु भाषेत हा ' येशू यहुद्यांचा राजा ' ( लुक २३:३८ ) हा फलक देखील लावला . तसेच इसवी सन ७० च्या सुमारास म्हणजे येशुच्या मृत्युनंतर ४० वर्षांच आतच रोमी सेनापती टायटस याने इस्त्राईल ( यहुदी ) राष्ट्राची धुळधाण केली . तेव्हापासून गेली २००० वर्षे १९४८ सालापर्यंत यहुदी लोक जगात राष्ट्रविरहीत परागंदा होते .


प्राचीन अख्रिस्ती व ख्रिश्चन लेखकांच्या अनेक शाबुत हस्तलिखितांखेरीज ख्रिस्त पुर्व काळातील बायबलमध्ये वर्णन केलेल्या घटना , व्यक्ति व ठिकाणे ही देखील सत्य होती यांना कमालीची पुष्टी देणारा विलक्षण पुरावा उत्खननाद्वारे पुढे आला आहे . नेल्सन ग्लुएक , डब्ल्यु , एल . ऑलब्राईट यांच्या सारखे सुप्रसिध्द पुरातत्वशास्त्रवेत्ते , तसेच सर फ्रेडरिक कॅनियन ( ब्रिटीश स्कॉलर व डायरेक्टर ऑफ ब्रिटीश म्युझियम ) एफ.एफ. ब्रुस यांच्या सारख्या या विषयावरील नामांकित व विद्वान अभ्यासकांनी बायबलमधील घटना , स्थळे , व्यक्ति , ऐतिहासिक पार्श्वभूमि व भौगोलिक ठिकाणे यांच्या वास्तवतेला व सत्यतेला स्पष्ट शब्दात दुजोरा दिलेला आहे .


निकष- २ ( अचुकता )


ज्या प्रमाणे दैवी प्रेरणेने प्राप्त झालेल्या लिखाणामध्ये असत्य असूच शकत नाही . कारण जिवंत देव कधीच खोटे बोलत नाही , त्याचप्रमाणे अशा लिखाणामध्ये चूकही असू शकत नाही . कारण देव कधीच चूक करीत नाही आणि म्हणूनच बायबलमधील घटना , स्थळ , कालक्रमाच्या वर्णनातील अचूकता मानवाला थक्क करणारी आहे . उदा . द्यायचे झाल्यास बायबलमध्ये , दानियेल नावाच्या संदेष्टयाच्या काळात सुमारे ( ख्रि.पू. ६०० ) बेलशस्सर नावाचा बॅबिलोनियन राजा होऊन गेल्याचे सांगितले आहे . परंतु इसवी सन १८५४ पर्यंत बेलशस्सर राजाचे नाव कोणत्याही ऐतिहासिक कागदपत्रात आढळले नव्हते . परंतु त्याच्याऐवजी त्याच काळात नबोनिडस राजा होऊन गेल्याचा उल्लेख मात्र बॅबिलोनियन राजांच्या यादीत होता . याचे निमित्त करुन बायबल विरोधी टीकाकारांनी बायबलमध्ये ही चूक आहे असा घोष चालवला होता . परंतु इसवी सन १८५४ मध्ये सर हेन्री रॉलिंसन या पुरातत्व संशोधकाला बाबिलोन मधील उर या ठिकाणी उत्खननात टेराकोटा प्रकारातील मातीचे भांडे सापडले . त्यावर ' नबोनिडसचा ज्येष्ठ पुत्र


बेलशस्सर ' होता असा लेख कोरलेला आढळला . पुढे १८७६ मध्ये उत्खननात क्यूनिफॉर्म लिपीत कोरलेले लिखाण असलेल्या दोन हजारावर विटा ( टॅबलेट्स ) सापडल्या . त्यामध्ये नेबोनिडस राजाच्या गैरहजेरीत त्याचा मुलगा बेलशस्सर राजा म्हणून राज्य करीत होता , असे लेख सापडले व त्या बरोबरच बायबलमधील लिखाणाची अचूकता सिध्द झाली.


अशाच प्रकारे इतर घटनांच्या स्थळ व कालसंबंधीची अचूकता उत्खननातील पुराव्यावरुन सिध्द झाली आहे .


हयाचाच दुसरा भाग म्हणजे , जगात १९४७ सालापर्यंत बायबलमधील ओल्ड टेस्टेंमेंट ( जुना करार ) भागाची हिब्रू भाषेतील सर्वात प्राचीन व जी संपूर्ण अवस्थेतील हस्तलिखित प्रत उपलब्ध होती तिचे नाव “ कोडेक्स बॅबिलोनिकस पेट्रोपॅलीटेनस " असे ठेवले गेलेले आहे . ती इसवी सन १००८ मध्ये लिहिलेली होती . सध्या ती लेनिनग्रॅड येथे आहे . त्याचप्रमाणे इसवी सन ९१६ सालातील आयझाया ( यशया ) पुस्तकातील प्राचीनतम लिखाणही उपलब्ध आहे .


त्याच सुमारास म्हणजे १९४७ सालात मृत समुद्राच्या किनाऱ्याजवळील कुमरान भागातील डोंगरात गुहांमध्ये मोठ्या प्रमाणावर पार्चमेंट जातीच्या चर्म पत्रावर लिहिलेल्या हस्तलिखीतांचा खळबळजनक शोध लागाला . ते लिखाण आजपासून सुमारे २१३६ वर्षांपुर्वीचे आहे . त्यामध्ये ओल्ड टेस्टॅमेंट मधील हिब्रू भाषेतील ' आयझाया '

( यशया ) नावाच्या पुस्तकाची अखंड प्रत मिळाली . त्यातील मजकूर इसवी सन ९१६ मधील हस्तलिखीताशी ताडून पाहिल्यावर त्यामध्ये आश्चर्यकारक अचूकता आढळली . ख्रि.पू. १२५ ते इसवी सन ९१६ या सुमारे हजार वर्षांच्या काळात या मजकुराच्या एकावरुन दुसरी , दुसरीवरुन तिसरी अशा अनेक प्रती झाल्या तरी त्यातील अदभूत वैशिष्ट्य म्हणजे या प्रतीत कळत नकळत अर्थ किंवा वर्णना बाबत काहीच फेरफार झालेला नाही , ही आश्चर्यकारक अचूकता दैवी सामर्थ्यांच्या हात असल्याशिवाय अशक्य आहे हे निश्चित सिद्ध होते.


तसेच बायबलच्या न्यू टेस्टमेंटच्या ( नव्या कराराच्या ) ग्रीक हस्तलिखित प्रतींची हकीगतही विस्मयजनक आहे. इसवी सन १३० च्या सुमारास लिहिलेली न्यू टेस्टमेंटमधील ( नव्या करारातील ) काही मजकूर शाबुत असलेली सर्वात जुनी समजली जाणारी हस्तलिखित प्रत आज रोजी मॅचेस्टर येथील जॉन रेलँड लायब्ररीमध्ये उपलब्ध आहे . ती पपायरस ( झाडाच्या सालीपासून बनविलेली लिहिण्याचे माध्यम ) वर लिहिलेली आहे ही , प्रत १९१७ साली इजिप्तमध्ये सापडली . अशा प्रकारे इसवी सन १५० , २०० , २५० इ . सालातील पूर्ण व अपूर्ण अवस्थेतील ग्रीक भाषेतील ५३०० हून अधिक हस्तलिखिते जगात अस्तित्वात आहेत . तसेच १०००० लॅटीन व्हलगेट आणि इतर भाषेतील म्हणजे इथिओपिक, हस्तलिखितांच्या न्यू टेस्टॅमेंट ( नवा करार ) या बायबलमधील एका भागाच्या पूर्णपणे शाबूत अथवा अवशिष्ट अवस्थेतील प्राचीन प्रती अस्त्विात आहेत . त्यामध्ये कमालीची एकवाक्यता आहे. मूळ ग्रीक भाषेतील हस्तलिखित प्रतींमध्ये थक्क करणारी अचूकता आहे .


प्राचीन काळात लिहिलेल्या इतर कोणत्याही ग्रंथाच्या इतक्या मोठया प्रमाणावर उपलब्ध हस्तलिखित प्रती आढळत नाही . बायबल हा दैवी प्रेरणेने लिहिलेला ग्रंथ असल्यानेच तो काळाच्या ओघात नष्ट झाला नाही .


यहुदी धर्म पुढारी व रोमी राजसत्तेपासून ते अलिकडच्या काळातील रशिया , चीनच्या सत्ताधिशांनी व राजसत्तांनी ख्रिस्ती धर्म नष्ट करण्याचा प्रयत्न केला . परंतु हे सर्व प्रयत्न दैवी सामर्थ्या पुढे दुर्बल ठरले .


यावरून " शाश्वतता ” ( इमपेरीशॅबिलीटी ) या आणखी एक दैवी प्रेरणेबाबत असलेल्या निकषामधुन जात असताना बायबलची घोडदौड अलौकीकतेच्या पथावर अपराजित व अजिंक्य ठरली आहे . हेच दिसून येते.


बायबलमधील शास्त्रीय ज्ञानाबद्दल आलेले संदर्भ परिक्षण केले असता ते देखील अचूक आहेत हे स्पष्ट होते.


बायबलमधील ओल्डटेस्टॅमेंट ( जुना करार ) भागात जोब ( इयोब ) या पुस्तकात ( जोब २६ : ७ ) फार प्राचीन काळीच असे विधान केले आहे की , पृथ्वी ( देवाने ) अवकाशात निराधार टांगली आहे ( म्हणजेच पृथ्वी कशावरही टेकलेली नाही ) काय अदभूत अचुकता !


तसेच पृथ्वी सपाट नाही तर चेंडूप्रमाणे गोल ( स्फेरिकल ) आहे हे विधान देखील आयझाया

( यशया) हया पुस्तकात ( आयझाया ४० : २१-२२ ) मध्ये आढळते . आयझायाचा ( यशयाचा ) काळ हा

ख्रि . पू . सुमारे ७४० ते ६८० होता .कोणतीही शास्त्रीय साधन उपलब्ध नसताना केलेली ही विधाने केवळ दैवी प्रेरणेतूनच आली आहेत हे यावरून सप्रमाण सिद्ध होते .


डायनॅसॉरस सारखे महाकाय प्राणी पृथ्वीवर होते याला दुजोरा देणारी माहितीही ओल्डटेस्टॅमेंटमधील जोब

( इयोब ) या पुस्तकात पहायला मिळते . जोब मध्ये वर्णन केलेला " बेहेमोथ " हया प्राण्याचे साम्य डायनॅसोरसशी असल्याचे निदर्शनास येते

( पहा इयोब ३ ९ : १५-२४ )


बायबलमधील विज्ञानाच्या माहिती संबंधी असलेली अचूकता ही निश्चितच नेत्रदिपक ठरली आहे .


देव सर्वज्ञानी असल्यामुळे देवाच्या हातुन कधीच चुका होत नाही हे सत्य जर समजून घेतले तर जगात दैवी प्रेरणेने लिहिलेले पुस्तक कोणते आहे हे समजण्यास विलंब लागणार नाही .


निकष -३ ( अटळता )


बायबलमध्ये दैवी प्रेरणेने लिहिलेल्या सुमारे ५०० च्या वर भविष्यवाणी शब्ध्दशः पूर्ण झाल्या आहेत . आजच्या काळात त्याचा प्रत्यय मोठया प्रमाणावर येत आहे . उदा. ख्रि.पू. ८५० मध्ये सूचकात्मक भविष्य केले गेले की ,

“ ( मनुष्य ) आकाशात घरटे बांधील " ( मतितार्थ किंवा गर्भितार्थ उधृत ) ( बायबल - ओवद्या १ : ४ ) पृथ्वी भोवती घिरटया घालणाऱ्या अवकाशयानात महिना - महिना वास्तव्य करणारे अंतराळवीरांनी आकाशातील घरटयात वास्तव्य केले नाही असे कोण म्हणेल ! सुमारे २८५६ वर्षापुर्वी मनुष्यबुध्दीने कुणी हया गोष्टीची कल्पना तरी केली असेल काय ?


इस्त्राइल ( यहुदी लोकांच्या ) बद्दलची भविष्यवाणी देखील अशीच रोमांचकारी आहे . इस्त्राइल राष्ट्रातील लोक जगभर विखरले जातील. ( बायबल - (लेवीटीकस) लेवीय २६ : ३३-१-५ )

( भविष्यकथन ख्रि.पू.१४०० ) हया भविष्याची पूर्तता इसवी सन ७० साली झाली. त्यावेळेस रोमी सेनापती टायटसने जेरुसलेमला वेढा घालून आक्रमण केले व त्यानंतर इस्त्राइलची धुळधाण केली .


परंतु याहीपेक्षा अदभूत धक्कादायक भविष्यवाणी म्हणजेच हयाच इस्त्राइल राष्ट्रातील लोक पुन्हा त्यांच्याच देशात एकत्र येतील व ओसाड झालेली त्यांची भूमी पुन्हा बहरुन येईल . हे भविष्य बायबलमध्ये ( बायबल एझेकियेल

( येहजकेल ) ( ख्रि.पू. ५ ९२ ५७० ) ३६ : ३३-३५ डयुटरोनॉमी ( अनुवाद ) ३० : २-५

(भविष्यकथन ख्रि.पू. सुमारे १४०० ) येथे केले आहे .


दैवी चमत्काराशिवाय हया भविष्यवाणीची पूर्तता शक्य होणार होती काय ? पृथ्वीच्या पाठीवर २००० वर्षे परागंदा भटकणारा वंश शाबुत राहतो का ? आणि होलोकास्टमध्ये वंश संहार करणाऱ्या नाझींनी ६० लाख ज्यूंची हत्या करून देखील व जगात जागोजागी भयंकर छळातून जाऊनही हा वंश कसा जिवंत राहतो ?


१४ मे १ ९ ४८ साली इस्त्राएली लोकांना त्यांचा देश म्हणजेच त्यांचीच मूळ भूमी परत कशी मिळू शकली ? २००० वर्षात वाळवंटा सारख्या झालेल्या भूमीतून आज जगात फुले व फळे इतक्या मोठ्या प्रमाणात कसे निर्यात होऊ शकतात ? शेतीपासून सर्व महत्त्वाच्या तंत्रज्ञानात हा देश जगात अल्पावधीत नेत्रदिपक कामगिरी करुन अग्रेसर कसा ठरु शकतो ? आजुबाजूचा बाकीचा वाळवंटी प्रदेश वाळवंटी अवस्थेत राहतो परंतु हया चिमुकल्या देशाच्या मातीत मात्र कसे परिवर्तन होते ? हयांची उत्तरे मिळण्यासाठी पुन्हा बायबलकडे वळणे आवश्यक आहे . कारण जिवंत देवाने म्हणजे यहोवा परमेश्वर देवाने म्हंटले आहे,

( बायबल यिमर्या ३२:२७ ) मी अखिल मानवजातीचा देव आहे . मला अशक्य काय आहे ? " .


उपरोक्त काही थोडक्या उदाहरणावरुनच बायबल हे दैवी प्रेरणेने लिहिले आहे हे स्पष्ट होते . आणि ते दैवी शब्द आहे म्हणूनच त्यातील भविष्यवाणी अटळतेने पूर्ण होताना दिसून येते .


लेखांक: २


येशु ख्रिस्त देव आहे का ?

(येशु ख्रिस्ताचे देवत्व निर्विवादच आहे हे निश्चित याचे पुरावे )


सत्यता , अचूकता व अटळता हे निकष लावून आत्तापर्यंतच्या उपरोक्त विवेचनामध्ये आपण बायबलच्या दैवी प्रेरणेबद्दल परिक्षण केले .


बायबलचे लिखाण हे दैवी प्रेरणेनेच झाले आहे हे सिध्द झाल्यामुळे त्यामध्ये वर्णन केलेले येशु ख्रिस्ताबद्दलचे सर्व संदर्भही सत्य म्हणून स्विकारणे क्रमप्राप्त ठरते . कारण ते तर्कसुसंगत आहे . बायबल येशू ख्रिस्ताबद्दल काय सांगते ?


१ ) ओल्ड टेस्टमेंट मधील ( जुन्या करारामधील ) संदर्भ : - ख्रिस्ताचे देवत्व स्पष्ट करणारे व सूचीत करणारे अनेक संदर्भ ओल्ट टेस्टमेंटमध्ये ( जुन्या करारामध्ये ) आहेत . उदा . " हे देवा तुझे राजासन युगानयुगीचे आहे " स्त्रोत्र

( साम ) ४५ : ८ हा ओल्ड टेस्टमेंट ( जुन्या करारा ) मधील संदर्भ ख्रिस्ताला लागू आहे हे न्यू टेस्टॅमेंटमध्ये हिब्रु १ : ८ हया संदर्भाद्वारे बायबलमध्ये देवाने दाखवून दिलेले आहे . स्त्रोत्र ( साम ) पुस्तकातील उपरोत संदर्भ हा ख्रि.पू. सुमारे १००० वर्षापुर्वीचा आहे . ( तसेच आयझाया ( यशया ) ९ : ६ , ७:१४ देखील पहा . )


ख्रिस्ताचे " अनादित्व " दाखवणारा आणखीन एक संदर्भ मिखा ५ : २ मध्ये दिला आहे . तो असा

“त्याचा उद्भव प्राचीन काळापासून अनादि काळापासून आहे. "

बेथलहेम गावात जन्म घेणारा हा अलौकीक पूत्र हा केवळ देवच असू शकतो . कारण अनादि काळापासून केवळ देवच अस्तित्वात असू शकतो . मनुष्य नव्हे ! बायबलमधील मिखा हया पुस्तकातील हा संदर्भ ख्रि.पु. ७३५ ते ७१० या काळात लिहिला गेला .ख्रिस्ताच्या अनादित्वाला न्यू टेस्टमेंट ( नव्या करारातील ) मधील जॉन ( योहान )

(वाचा १ : १ , २ , १५ ) या वचनांद्वारे दुजोरा दिलेला आहे . ”


भविष्यवाणींची अदभूत पूर्तता : - येशू ख्रिस्ताच्या जन्मापूर्वी शेकडो वर्षे अगोदर त्याच्या बद्दल सांगितलेली भविष्यवाणी तंतोतंत पूर्ण झाली . येशू हाच ओल्ड टेस्टॅमेंटमध्ये ( जुन्या करारात ) उल्लेख केलेला मुक्तीदाता मसिहा म्हणजे ख्रिस्त आहे हे मानवाला सजण्यासाठी हे भविष्यकथन केले गेले . दैवी योजनेनुसार मानवाच्या मुक्तीसाठी देव स्वतः देहधारण करुन मनुष्याला प्रगट होणार होता . तेव्हा ख्रिस्ताबद्दल ओल्ड टेस्टॅमेंटमध्ये ( जुन्या करारात ) जी भविष्यवाणी सांगितली आहे ती ज्याला लागू होईल व त्याच्या जीवनात पूर्ण होईल तोच खरा ख्रिस्त म्हणजे मानवांचा मुक्तीदाता देव हे मनुष्याला ओळखणे सोपे जाणार होते . म्हणूनच ही भविष्ये दिली गेली . ही सर्व भविष्यवाणी जगात केवळ येशू ख्रिस्तामध्येच पूर्ण झाल्यामुळे त्याच्या देवत्वाबद्दल काहीच शंका उरत नाही . येशू विषयी भविष्य आणि त्याची परिपूर्ती याची काही उदाहरणे खाली देत आहे .


२ ) ख्रि.पू. सुमारे ७३५ च्या सुमारास बायबलमधील मिखा ५ : २ मध्ये येशू ख्रिस्त बेथलहेम या गावात जन्म घेणार आहे असे दैवी भविष्य सांगण्यात आले होते ते येशूचा जन्म बेथलेहेमात झाल्याने खरे ठरले .


ख्रि.पू. सुमारे ७०० च्या सुमारास आयझाया ( यशया ) या संदेष्टयाच्या द्वारे ( यशया ७:१४) मध्ये ख्रिस्ताबद्दल असे सांगण्यात आले की , तो कुमारीच्या उदरी पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने जन्म घेणार आहे , हे भविष्य देखील शब्दशः पूर्ण झाले आहे. येशूचे व्यक्तिमत्व जर असामान्य व अलौकिक होते तर त्याचा जन्मही अलौकिक पध्दतीने होणे अपेक्षित होता . अगदी त्याचप्रमाणे येशूचा जन्म झाला.( लुक १:३४ , ३५ )


इस्त्राइल राष्ट्राची निर्मिती ज्या १२ वंशापासून झाली त्यापैकी एक यहुदा नावाच्या वंशात येशू जन्म घेणार आहे हे भविष्य जेनेसिस ( उत्पत्ती ) ४९ : १० मध्ये ख्रि.पू. सुमारे १४०० वर्षापुर्वी सागण्यात आले . येशूचा जन्म यहुदा वंशातच झाल्याने हया देखील भविष्याची पूर्तता झालेली दिसून येते. ( लुक ३:३३ ) .


एखाद्या सामान्य मनुष्याला आपण कोणाच्या उदरी , कोणत्या वंशात , कोणत्या गावात जन्माला यायचे हे ठरवता येते का ? हया घटना मानवी कुवतीच्या व क्षमतेच्या बाहेरच्या असतात . पण येशूच्या बाबतीत मात्र शास्त्रलेखाप्रमाणे तंतोतंत घडले यावरुन तो इतर सामान्य मानवाप्रमाणे नव्हता , तर तो पूर्ण देव व पूर्ण मनुष्य होता. परंतु आपला प्रभू येशू ख्रिस्त मानव बनून जेव्हा या पृथ्वीवर आला तेव्हा तो संपूर्णपणे निष्कलंक व पवित्र होता.



३ ) ख्रिस्ताचा मृत्यु देखील कसा होईल याचे व्यापकरितीने बायबलमध्ये भविष्य केले गेले आहे . त्यापैकीच एक म्हणजे त्याच्या ( हाता पायांना ) “ विंधीले जाईल " ( म्हणजेच खिळे ठोकले जातील ) हे ख्रि.पू. ५०० च्या सुमारास ( जखऱ्या १२:१० ) मध्ये लिहिलेले भविष्य येशू ख्रिस्ताच्या क्रॉसवरील मृत्यूने शब्दशः खरे ठरले . येशूच्या मृत्युनंतर तो पुन्हा जिवंत होईल व स्वर्गात घेतला जाईल ही अदभूत भविष्ये ख्रि . पू . १००० मध्ये ( साम ( स्त्रोत्र ) १६:१० व ६८:१८ मध्ये ) सांगितली गेली . ती येशू ख्रिस्ताच्या मरणानंतर ३ दिवसांनी झालेल्या पुनरुत्थानाने ( पुन्हा जिवंत होण्याने ) व स्वर्गारोहणाने अदभूत रितीने पूर्ण झाली .


अशा अनेक भविष्यवाणींची येशू ख्रिस्तामध्ये पूर्णता झाली त्या बरोबर त्याच्या ओळखीबाबतही शिक्कामोर्तब झाले .


४ ) येशू ख्रिस्ताचे दैवी गुण : केवळ देवाच्या ठिकाणीच पाहता येतील अशी काही सर्वसामान्य गुण वैशिष्ट्ये आहेत . ते गुण सर्व सामान्य माणसांच्या ठायी कधीच आढळून येणार नाहीत . देव व मानव , निर्माता व निर्मिती यामधील फरक दाखविणारे हे गुण आहेत ते खालीलप्रमाणे :


१ ) सर्वव्यापित्व ( ओम्नीप्रेझेन्ट ) : - एका वेळेस मनुष्य एकाच ठिकाणी हजर असू शकतो परंतु केवळ देव हाच फक्त एकाच वेळी सर्वत्र हजर असतो . त्याच्या हया गुण वैशिष्टयाला " सर्वव्यापित्व " म्हणतात . येशू ख्रिस्ताने जी अभिवचने दिलेली आहेत तिच्या वरुन येशूच्या हया देवी गुणधर्माची खात्री पटते . कोणताही मनुष्य अशी आश्वासने व वचने देऊ शकणार नाही .


१ )मत्तय ( मॅथ्यू ) २८:१८ यामध्ये " येशू जवळ येऊन त्यांच्याशी ( शिष्यांशी ) बोलला . " " पहा काळाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्या बरोबर आहे . " " स्वर्गारोहण झालेला येशू ” युगाच्या समाप्तीपर्यंत सर्व दिवस " पृथ्वीवरील शिष्यांबरोबर देखील " असणार आहे असे येथे स्पष्ट होते . दुसरा आणखी एक संदर्भ मत्तय ( मॅथ्यू ) १८:२० मध्ये आहे . “ कारण जेथे दोघे किंवा तिघे माझ्या नावाने एकत्र जमले आहे तेथे मी आहे." देवत्वाचा " सर्वव्यापी ” हा गुण येशू ख्रिस्तामध्ये


होता म्हणूनच त्याने हे अभिवचन शिष्यांना दिले .


२ ) सर्व शक्तिमानता ( ओम्नीपोटेन्ट ) : - केवळ देवालाच ज्या गोष्टी शक्य आहेत व ज्या मनुष्यांच्या हातून कधीच घडू शकणार नाही अशा अतर्क्य गोष्टी येशूने केल्या . उदाहरणादाखल काही खाली नमुद करत आहे .


अ ) मृत्युवर सामर्थ्य : मेलेल्या व्यक्तिना जिवंत करण्याचा चमत्कार येशुने केला . ज्यांनी हे चमत्कार पाहिले त्यांनी त्याची नोंद न्यू टेस्टमेंट गॉस्पेल मध्ये

( नविन करारात ) करुन ठेवली आहे . ( पहा जॉन

( योहान ) ११:४३ , मॅथ्यू ( मत्तय ) ९ : १८ , २३ )


ब ) निसर्गावर अधिकार : वादळ , वारे , लाटा यांना कोणता मनुष्य काबुत ठेवू शकेल काय ? सामान्य मनुष्याला हे अशक्य आहे . पण निर्मितीवर अधिकार असणारा एक पूर्ण देव व पूर्ण मानव या जगात येऊन गेला . त्याचेच नाव येशू ख्रिस्त . त्याने वादळ , वारे व खवळलेल्या लाटांना आपल्या केवळ अधिकारवाणीच्या शब्दाने शांत केलेले पाहिल्यावर त्याचे शिष्य देखील


थक्क झाले . ( मॅथ्यू ( मत्तय ) ८ : २३-२७ )


क ) आजारांवर अधिकार : लंगडे , पांगळे , जन्मांध अशा अनेक पीडीतांना येशू ख्रिस्ताने आपल्या अधिकारयुक्त वाणीने व दैवी सामर्थ्याने आरोग्य दिले . येशू बोलला किंवा त्याने स्पर्श केला आणि अनेक लोक बरे झाले .


३ ) सर्वज्ञानीपणा ( ओम्नीशीयन्ट ) : - येशूचे शिष्य समुद्रात वादळात सापडले . येशू त्यांच्या जवळ अजुन आला नव्हता पण शिष्य संकटात आहेत हे तो सर्वज्ञानी असल्याने त्याला समजले . येशूने समुद्रावरुन चालत येऊन त्यांना वाचवले . ( जॉन ( योहान ) ६ : १६)

येशू ख्रिस्ताचे सर्वज्ञानीपण दाखविणारे आणखीही काही संदर्भ आहेत . ( जॉन ( योहान ) १:४८ , मार्क ५:३० , लुक १ ९ : ५ )


५ ) येशू ख्रिस्ताचे पुनरुत्थान : - येशू ख्रिस्त स्वतः मरणातून तिसऱ्या दिवशी जिवंत झाला हा चमत्कार त्याचे देवत्व सिध्द करणारा मनुष्यांसाठी सर्वात महान पुरावा आहे . पुनरुत्थित येशूला पाहणारे त्याचे शिष्य ही


ऐतिहासिक घटना पाहणारे आय - विटनेस ( प्रत्यक्ष साक्षीदार ) होते . ( जॉन ( योहान ) २० : १ ९ -२५ , २१-२५ ) येशू जिवंत झाल्यावर ४० दिवस त्याने दर्शन दिले . एका वेळेस तर त्याने पाचशे हुन अधिक लोकांना दर्शन दिले . त्याची नोंद त्यांनी न्यू टेस्टमेंटमध्ये ( नव्या करारात ) केली आहे .


ज्यांनी जिवंत झालेल्या येशूला पाहिले त्यांचे जीवन बदलून गेले व त्याच येशूसाठी ते शिष्य प्राण देण्यास सिध्द झाले त्याच येशूची साक्ष त्यांनी तत्कालिन जगाला दिली . जगाची उलथा पालथ करणारे ते हेच का ? असे त्यांच्या विषयी लोक बोलू लागले . असत्य गोष्टीसाठी कोणी आपला प्राण धोक्यात घालणार नाही ही वस्तुस्थिती आहे . परंतु एक नव्हे तर हजारो लोकांनी आजपर्यंत येशू ख्रिस्तावरील विश्वासासाठी आपले प्राण अर्पण केले कारण ख्रिस्ताचे देवत्व त्यांनी निर्विवादपणे स्विकारले होते .


यहुद्यांचा सुप्रसिध्द विदवान पौल ( पुर्वीचा शौल ) ख्रिस्ताच्या स्वर्गारोहणानंतर ख्रिश्चन लोकांचा छळ करण्यात पुढाकार घेत होता . परंतु त्याला पुनरुत्थित


ख्रिस्ताचे दर्शन होताच त्याने ख्रिस्ताचा स्विकार केला . आणि नंतर त्याने ग्वाही दिली की , " ख्रिस्त मेलेल्यातून उठवला गेला आहेच. ” ( १ करिथ १५:२० ) तो पुढे म्हणतो , जर ख्रिस्त उठवला गेला नसता तर आमचा विश्वास व्यर्थ ठरला असता . ज्या ५०० लोकांना

पुनरुत्थीत ख्रिस्त दिसला , “ त्यातील बहुतेक आजपर्यंत ( म्हणजे पौल लिहीत होता त्यावेळेपर्यंत इसवी सन ५१-५२ च्या सुमारास ) हयात आहेत ” असेही त्याने लिहून ठेवले आहे .


ख्रिश्चन लोकांचा तीव्र छळ करणारी व्यक्ती पुनरुत्थित ख्रिस्ताला समक्ष पाहिल्याशिवाय अशी विधाने करील काय ?


म्हणूनच ख्रिस्ताचे पुनरुत्थान ख्रिश्चन विश्वासाचा कणा समजला जातो .


येशू ख्रिस्ताने स्वतःचे देवत्व कधीच नाकारले नाही . मनुष्य प्रकृतीचे होऊन त्याने लीनता धारण केली ही त्याची महानता आहे . पण जसा एखादा डॉक्टर , डॉक्टर असताना डॉक्टर नाही असे म्हणणार नाही . अगदी


तसेच येशू देव असल्यानेच त्याने तो कोण आहे हे सर्वांना प्रगट केले आणि आजही त्याचा विश्वासाने स्विकार करणाऱ्याला २००० वर्षानंतरही मिळत असलेल्या जीवन परिवर्तनाचा अदभूत शांतीचा व येशू कडून झालेल्या पापमुक्तीचा प्रत्यक्ष अनुभव घडतो . हेच त्याचे देवत्व जाणुन घेण्याचे मर्म आहे .


लेखांक: ३


बायबल नैतिक व तर्कनिष्ठ छाननीवर टिकू शकते का ? ख्रिश्चन धर्मसिध्दांताची वैधता:

( Logic Behind the Christian Faith )


ख्रिश्चन धर्मीयांचा येशू ख्रिस्तावरील विश्वास हा बायबल हया शब्द प्रमाणावर ( दैवी प्रेरणेचा मापदंड ) व त्यामध्ये वर्णन केलेल्या ऐतिहासिक सत्यावर , आणि देवाकडून प्राप्त होणाऱ्या वैयक्तिक अनुभवावर आधारीत आहे .


बायबल हे देवाच्या प्रेरणेने लिहिलेले असून ते जिवंत देवाकडून आल्यामुळे विश्वासार्ह आहे हया मूलभूत तत्त्वावर वर उल्लेखल्या प्रमाणे ख्रिश्चन धर्मीयांचा विश्वास अधिष्ठीत ( स्थिरावलेला ) आहे . त्या विश्वासाचा अपरिहार्य परिपाक

( परिणाम ) म्हणजे विश्वासणाऱ्याला प्राप्त झालेले आत्मीक जीवन , शांती , आनंद व मुक्ती यांचा लाभ !


बायबलमधील शब्दांचा स्वीकार व प्रत्यक्ष आलेला वैयक्तिक अनुभव यांची सांगड जुळल्यामुळेच ख्रिश्चन व्यक्तिच्या विश्वासाला बळकटी आलेली असते .


ख्रिश्चन धर्मातील मुक्ति विषयक तत्वज्ञानाचा मूलभूत पाया येशू ख्रिस्ताच्या अलौकीक व्यक्तिमत्व विशेषावर आधारीत आहे . जगात केवळ बायबलमधील मुक्ति विषयक धर्म सिध्दांत हा ' कर्मवादावर ' अवलंबून नसून ' पर्याय किंवा बदली वादावर ' अधिष्ठित आहे . या धर्म सिध्दांतानुसार मनुष्य आदि पतनानंतर ( म्हणजे मानव जातीचा मूळ पुरुष आदाम याच्या पतनानंतर ) जन्मतः( स्वभावतःच ) पाप स्वभावाने बध्द असा जन्मास येतो . म्हणूनच स्वकर्माद्वारे नीतीकृत्ये करुन देवाला संतोषविणारे जीवन जगण्यास मानव असमर्थ ठरतो . त्यामुळेच स्वर्गप्राप्ती किंवा मुक्ती मानवी कर्माद्वारे अशक्य ठरते .



कारण अंतःकरणातील आंतरिक बदल व सुधारणा , पापक्षालना शिवाय होत नसते हे निर्विवाद सत्य आहे . त्यामुळेच पापकृत्यांची नैसर्गिक परिणती म्हणजे मृत्यूनंतर सार्वकालिक नरकवासाचा दंड मनुष्यावर ओढवला जातो

देवाची मनुष्यावर महान प्रीति असल्याने नरकदंडापासून मानवाला मुक्ति देण्यासाठी आणि स्वर्गीय जीवन व पापांची क्षमा करण्यासाठी येशू ख्रिस्त देव असताना मानव बनून आला .


त्याने मनुष्यांच्या बदली , पापाचा व त्या अनुषंगाने आलेल्या शिक्षेचा दंड स्वतःवर घेऊन क्रॉसवर संपूर्ण मानव जातीसाठी शिक्षा भोगली . बदली सिध्दांतानुसार ( डॉक्ट्रिन ऑफ सबस्टीटयूशन ) पापी मानवासाठी मरणारी व्यक्ति संत , महात्मा कि चांगले शिक्षण देणारा गुरु असून चालणार नव्हते . तर ती व्यक्ति पवित्र , निर्दोष, निष्कलंक या स्वरुपात पूर्ण मनुष्य व पूर्ण देव म्हणून पृथ्वीवर येणे आवश्यक होते .


येशु ख्रिस्ताने पूर्ण मनुष्य म्हणून देहधारणा केल्याने मनुष्याच्या बदलीच्या वेदना , शिक्षा आणि मरण वास्तवरीतीने तो स्वतःवर घेऊ शकला . तो मनुष्य झाल्याने ' मनुष्याच्या बदल्यात मनुष्य ' ही न्यायाची अट पुरी करु शकला . पण तेवढयाने पूर्तता होऊ शकत नव्हती . येशू ख्रिस्त पूर्ण मनुष्य असतानाच पूर्ण देव असणे तितकेच महत्त्वाचे होते . कारण जर एका मनुष्याचा दंड दुसऱ्या एकाने भरला तर जगात फक्त एका मनुष्याच्या बदल्यात फक्त एकाच मनुष्याला मुक्ति मिळणे अपेक्षित ( तर्क सुसंगत ) आहे . परंतु जगाच्या निर्मितीपासून आत्तापर्यंतच्या ( जगाच्या शेवटपर्यंतच्या ) मनुष्यांच्या पापांचे काय ? त्यांना नरकदंडाच्या शिक्षेपासून मुक्ति कोण देणार ? हे प्रश्न निर्माण झाले असते .


येशू ख्रिस्त मनुष्य असतानाच तो पूर्ण देव होता अशा प्रकारे तो सर्व मनुष्याहून वेगळा असल्यानेच जगातील प्रत्येक मानवाच्या मरणपूर्व जीवनातील व मरणोत्तर नरकातील वेदना व दंड एकाच वेळी क्रॉसवर भरुन देण्यास पात्र व क्षम ठरला .


त्यामुळेच आता जगातील कोणत्याही पापग्रस्त मनुष्याला कर्मकांडा विरहीत , पूण्य कर्मा शिवाय पापक्षमा व स्वर्गप्राप्ती येशूचा स्विकार व पापांचा पश्चाताप केल्याने प्राप्त होते .


पाण्यात पोहता येत नसलेल्या व्यक्तिला , एखाद्या निष्णात पोहणाऱ्या व्यक्तिने पाण्यात उतरुन वाचविण्यासाठी बुडणाऱ्या जवळ जाण्यासारखे हे आहे. आता बुडणाऱ्याने पोहण्याचा निष्फळ प्रयत्न न करता मदतीला आलेल्या व्यक्तिवर पूर्ण भिस्त टाकणे एवढेच अपेक्षित असते .


उपरोक्त सर्वंकष चर्चेतुन एकच गोष्ट प्रकर्षाने सिध्द झाली की , कर्मवादा शिवाय देवाच्या कृपेने मनुष्याला पापांची क्षमा , स्वर्गीय जीवन व मुक्ति प्राप्त होते . हा ख्रिश्चन धर्म सिध्दांत हा तर्कशुध्द व ग्राहय ठरतो .


अशा प्रकारे एकंदरीत पाहता बायबल हे दैवी प्रेरणेतुन लिहिले गेले असून तर्कनिष्ठ छाननीवर परमतेजाने प्रकाशणाऱ्या सूर्याच्या प्रकाशाप्रमाणे देवाचा शब्द म्हणजे बायबल मधील सत्य हे तर्कशुध्द असे अधिक

प्रज्वलीतपणे सामोरे येते .

( Yes there is a logic behind the Christian faith , Christianity is not irrational )


पास्टर ( डॉ . ) राजकुमार विक्रम कोरे

डायरेक्टर

फायर मिनिस्ट्री

235 views0 comments

Comments


bottom of page